01/06/2026
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*सोयाबीन पिकाच्या सुधारित पेरणी व लागवड पद्धती**
✍🏻 Dr. Anant Ingle
सरी वरंबा # रुंध सरी वरंबा # पेरणी चे अंतर # उत्पादनाचे गणित # एकटी झाडांची संख्या #
==================
सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात, हल्ली नवीन वाणांची लागवड शेतकरी करत आहेत, प्रामुख्याने सोयाबीन हे एक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे महत्वाचे पीक झाले आहे. मुख्य पीक असल्याने शेतकरी उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान तसेच नवीन पद्धतींचा अवलंब करत असताना खर्च व वास्तविकता यांचा विचार करत नाहीत व त्यामुळे उत्पादन म्हणजेच उत्पन्न कमी होते. त्यामध्ये प्रामुख्याने लागवडीचे अंतर, वाण निवड व वाणांच्या गुणांनुसार जमीनीचा प्रकार आणि लागवडीची पद्धत-पेरणीची पद्धत व पेरणी चे अंतर या सर्व गोष्टींचा एकरी सरासरी झाडांची संख्या (Plant Population) यावर खूप मोठा परिणाम होतो व त्याचा पीक चांगले येऊन सुद्धा उत्पादनावर परिणाम होतो, यामध्ये खूप मोठ्या चुका शेतकरी मित्रांकडून होतात व त्यामुळे शेतकरी मित्रांचे उत्पादन कमी होते.
🔅 *सोयबीन पिकाचे अंतर व उत्पादनाचे गणित*
👉🏻कोणत्याही पिकाच्या उत्पादनवाढीसाठी त्याची एकरी झाडांची संख्या खूप महत्वाची असते त्यामुळे सोयाबीन पिकाचे जर आपल्याला चांगले उत्पादन घ्यावयाचे असेल तर एकरी सरासरी झाडांची संख्या राखणे आवश्यक आहे ( सरासरी १-१.५ लाख झाडे एकरी ) फुले संगम किंवा इतर वाढणारे वाण असेल तर कमीत कमी ८०-९० हजार असणे आवश्यक आहे.
👉🏻नेमकी हीच संख्या राखण्यात आपले शेतकरी चुकतात, ते म्हणजे कोणीतरी शेतकऱ्याने लागवड केलेली असते (२ फूट x ६ इंच) त्यामधे झाडांची संख्या ४४ हजार राहते आणि, त्यामुळे सोयाबीन चांगले येवून सुध्दा अपेक्षित उत्पादन मिळत नाही व शेतकरी नाराज होतो, परंतु याचे नेमके कारण बघणे आवश्यक आहे, ते म्हणजे : एकरी असलेली झाडांची संख्या. उदा. जर ४५ x १० सेमी वर लागवड केली तर ( जास्त वाढणारे व उशिरा येणाऱ्या वाणांसाठी) एकरी ८८ हजार झाडे बसतात, आपण ८० हजार पकडू, एका झाडला सरासरी १०० शेंगा लागल्या तर, म्हणजे २००-२५० दाणे, म्हणजे सरासरी २५-३० ग्राम सोयाबीन प्रती झाड, तर एकूण झाडांची संख्या ८० हजार म्हणजेच ८०,००० x २५ gm =२० क्विंटल ( ३० टक्के घट पकडुन १४ क्विंटल एकरी सरासरी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे) ; 👉🏻यांचे उलट आपण ६० x १५ सेमी वर लागवड केली तर, एकरी झाडांची संख्या बसते ४४ हजार ( आपण ४० हजार पकडू ) व प्रती झाड शेंगा सरासरी १५०-२०० म्हणजे ३००- ४०० दाणे म्हणजे ४० ग्राम प्रती झाड आणि एकरी ४०००० x ४० ग्राम= १६ क्विंटल ( २० टक्के घट पकडुन १२-१३ क्विंटल, जसेजसे अंतर वाढेल तसे संख्या कमी होईल व एकूण उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, जेव्हा तुम्ही दोन ओळी व दोन झाडातील अंतर जास्त ठेवणार आहात तेव्हा तेव्हढ्या प्रमाणात शेंगा सुध्दा लागणे आवश्यक असते, आणि त्यानुसार नियोजन करावे लागेल त्यामुळे यामध्ये रिस्क वाढत जाते व त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित उत्पादन येत नाही, 👉🏻त्यामुळे सांगायचा उद्देश असा आहे की जास्त अंतर ठेवू नये, ४५ X ७-१० सेमी हे अतिशय चांगले अंतर सोयाबीन पिकासाठी साठी आहे. ४५ x ७-१० सेमी लागवड केल्यास प्रती झाड १०० शेंगा, तर २००-२५० दाणे @ २५-३०gm म्हणजे उत्पादन १५ क्विंटल अपेक्षीत आहे त्यामुळे अंतर आणि झाडांची संख्या खूप महत्वाची आहे, त्यासाठी एकरी लागणारे बियाणे - २२-२५ किलो (८५-९० टक्के उगवण क्षमता असलेले) २५-२७ किलो ( ७५ टक्के उगवण क्षमता असलेले). हे वरील सर्व फुले संगम, फुले किमया आणि फुले दुर्वा, फुले कल्याणी अशा उंच वाढणाऱ्या वाणांसाठी आहे.
🔅 *शिफारसीनुसार अंतर ठेवून लागवड करावी* :
👉🏻हलकी जमीन असेल तर ३० x १० सेमी किंवा ३८ x ७-१० सेमी ( लवकर येणारे वाण),
👉🏻भारी जमीन असेल तर ४५ x ७-१० सेमी पेरणी किंवा बेड वर लागवड किंवा रूंध - सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी,
👉🏻लागवड करण्यासाठी दोन ओळींतील अंतर जास्तीत जास्त ४५-५० सेमी ठेवावे त्यापेक्षा जास्त अंतर ठेवू नये ( एकरी झाडांची संख्या कमी होते), तसेच फुले संगम किंवा फुले किमया या वाणांची लागवड करत असाल तर दोन ओळींतील अंतर ४५ सेमी ठेवणे आवश्यक आहे. परंतू फुले संगम किंवा किमया यांची पेरणी दाट होणार नाही याची काळजी घ्यावी.
👉🏻 पेरणी करताना जर आपली जमीन हलकी व मध्यम असेल तर लवकर येणारे वाण निवडावे तसेच ३८ x ७-१० सेमी याप्रमाणे पेरणी करावी ( एकरी २५ -२७ किलो बियाणे उगवणक्षमता बघून )
👉🏻नवीन वाण, नवीन पद्धती यांचा अवलंब नक्कीच करावा परंतु त्यांची वास्तविकता बघणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, कारण कोणत्या वाणाला : कशाप्रकारची जमीन व किती अंतर ठेवावे लागते हे बघूनच लागवड करावी जेणकरून आपले नुकसान होणार नाही.
👉🏻सोयबीन शेतीमध्ये होणारे बदल व बदलेली शेतीपद्धती यांचा अभ्यास केल्यास वेगवेगळ्या लागवड पद्धती आपण वापरू शकतो :
🔅 *पेरणी पद्धत :*
👉🏻 जमिनीचा प्रकार व वाण या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, जर लवकर येणारे वाण असेल आणि आपली जमीन हलकी –मध्यम असेल तर पेरणी पद्धीतीने आपण सोयबीन पिक घेऊ शकतो, त्यामध्ये प्रामुख्याने ट्रक्टर चलित पेरणी यंत्र किंवा बैल चलित पेरणी यंत्र वापरले जाते त्याचे अंतर ३० x १० सेमी, ३८ x ७-१० सेमी असे ठेवावे, भारी जमिनीत आपण मध्यम ते उशिरा येणारा वाण घेणार असाल तर ४५ x १० सेमी अंतर ठेवून पेरणी करावी.
🔅 *रुंध सरी वरंबा पद्धत* (रुंध बेड वरती लागवड किंवा पेरणी):
👉🏻जास्त पाऊस होण्याची संभाव्य शक्यता असल्यास तसेच आपल्या जमिनीत पाणी साचून राहत असेल तर, सोयबीन ची पेरणी बिबिएफ यंत्राने करावी किंवा दर तीन-चार ओळी नंतर एक चर काढावा
👉🏻बिबिएफ (रुंध सरी वरंबा) पद्धतीमुळे पावसाचे पाणी साऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते
👉🏻अधिक पाणी झाल्यास किंवा अधिकचे पाणी निचरा होण्यास मदत होते
👉🏻गादी वाफे किंवा वरंबा यावर हवा खेळती राहून पाणी व हवा योग्य प्रमाणात झाडला उपलब्ध होते
👉🏻बियाण्याची उगवण चांगली होते व पिक वाढ सुद्धा चांगली व जोमदार राहते
👉🏻कोरडवाहू तसेच बागायती दोन्ही साठी आपण हि पद्धत वापरू शकतो
👉🏻या पद्धतीने आपण आवश्यक अंतराचे वाफे / वरंबे तसेच दोन्ही बाजूनी सऱ्या तयार करू शकतो, त्यामुळे पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकरच वेळी करता येतात
👉🏻बिबिएफ यंत्राने ५-६ हेक्टर क्षेत्र प्रतिदिन आपण पेरू शकतो
बिबिएफ पद्धतीमुळे पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत २० ते २५ टक्के पर्यंत उत्पादन वाढ होते
पेरणी साठी बी बी एफ यंत्राचा वापर करणे अधिक योग्य व सोपे आहे कारण नवीन आलेल्या बी बी एफ यंत्रांनी सारख्या अंतरावर पेरणी केली जाते व समान खोलीवर दाणा पडतो त्यामुळे उगवण अतिशय चांगली होते, तसेच कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास, मूलस्थानी जलसंधारण होऊन पीक अतिशय चांगले येते व उत्पादन सुद्धा चांगले मिळते.
🔅 *सरी वरंबा पद्धत* (बेड वरती लागवड) :
👉🏻नव्याने वापरण्यात येणाऱ्या सरी-वरंबा पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणवर सोयबीन लागवड होत आहे
👉🏻यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो किंवा शेतामध्ये पाणी साचून राहते किंवा शेत पाणी धरते अशा परिस्थिती हि पद्धत अतिशय उपयुक्त ठरते
👉🏻खोलगट तसेच चोपण भागात असलेल्या शेतात आपण हि पद्धत वापरल्यास आपल्याला होणारे नुकसान टाळता येते
👉🏻यामध्ये आपण ३ फुट, ३.५ फुट आणि ४.५ फुट अशी सरी काढून त्यावर लागवड करू शकतो
👉🏻३ फुट सरी पडल्यास आपण सरीच्या दोन्ही बाजूंनी लागवड करू शकतो म्हणजे दोन ओळींतील अंतर दीड फुट (४५ सेमी.) इतके राहते
👉🏻जर ४.५ फुट सरी सोडली तर आपल्याला सरीच्या उंच भागाला सपाट करून त्यावर तीन तास लागवड करू शकतो
👉🏻अशा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते व जास्त पाऊस झाल्यास होणारे संभाव्य नुकसान टाळता येते.
👉🏻आपल्याला जर बेड वर लागवड करायची असेल तर आपल्याकडे सिंचन व्यवस्था असणे आवश्यक आहे म्हणजे ड्रीप किंवा इतर पद्धतीने पाणी व्यवसथापन करता येईल तरच बेड वर लागवड करावी.
👉🏻जर बेडच्या वरती लागवड करणार असाल तर बेड ची उंची कमी करून सपाट बनवून वरती ३५-४५ सेमी अंतर ठेवून लागवड करावी जेणकरून एकरी झाडांची संख्या राखली जाईल.
👉🏻बेड वर लागवड केली तर बऱ्याच वेळा सोयाबीन जास्त पाऊस झाला तर पडते, त्यामुळे आपली सोयाबीन जास्त प्रमाणात वाढणार नाही याची काळजी घ्यावी,
👉🏻बेड वर लागवड केल्यास आणि पावसाने दडी मारली तर सोयाबीन लवकर सुकते व त्यामुळे जर पाणी देणे शक्य नसेल तर उत्पादन मिळत नाही त्यामुळे बेड वर लागवड केल्यास ड्रिप ची किंवा इतर पाणी देण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
👉🏻महागडे बियाणे आणि पावसाची अनिश्चितता यांचा विचार केला तर लागवड केली तर ३०-४० टक्के बियाणे कमी लागते व झाडांची संख्या व्यवस्थित राखली जाते.
👉🏻लागवडीसाठी आपण *मनुष्य चलित यंत्राचा (टोकन यंत्र)* वापर करू शकतो, हे यंत्र वापरताना बेड वरती किंवा सपाट जमिनीवर आपण लागवड करू शकतो या यंत्राच्या सहाय्याने लागवड केल्यास बियाण्याची ३०-४० टक्के बचत होते व पिकाची उगवण चांगली होऊन एकसमान वाढ होते.
👉🏻वरीप्रमाणे सर्व गोष्टी सोयाबीन लागवड/ पेरणी करत असताना लक्षात ठेवणे आवश्यक आहेत व त्यानुसार नियोजन करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
धन्यवाद 🙏🏻
Dr Anant Ingle
Director Vidarbha Agriculture Development Foundation Chikhli Buldhana