09/08/2026
शांतीवन ही माणसं घडविणारी संस्था आहे - बालहक्क आयोग अध्यक्ष श्री. संजय पुराणिक.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. संजय पुराणिक यांनी काल शांतीवनला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी शांतीवनमधील मुलांसाठी सुरू असलेले विविध प्रकल्प, निवासी व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले उपक्रम प्रत्यक्ष पाहिले.
यावेळी त्यांच्यासोबत बालहक्क आयोगाचे सदस्य आणि शांतीवनचे मार्गदर्शक मा. श्री. अतुल देसाई, जिल्हा बालकल्याण अधिकारी श्री. फारूक शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. निर्मळ साहेब तसेच संबंधित कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शांतीवनमधील प्रत्येक प्रकल्प आणि मुलांसाठी सुरू असलेले काम पाहताना मा. श्री. संजय पुराणिक यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या मुलांना केवळ निवारा आणि शिक्षण न देता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि स्वावलंबन निर्माण करण्याचे शांतीवनचे कार्य त्यांनी जाणून घेतले.
संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेले शब्द आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत.
“ही केवळ मुलांची काळजी घेणारी संस्था नाही, तर माणसं घडविणारी संस्था आहे.”
मा. श्री. संजय पुराणिक साहेबांनी व्यक्त केलेला हा अभिप्राय शांतीवनच्या संपूर्ण परिवारासाठी मोठी प्रेरणा आहे.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.
शांतीवनला दिलेला वेळ, आत्मीयता आणि प्रोत्साहन याबद्दल मा. श्री. संजय पुराणिक साहेबांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.