24/09/2026
दशकपूर्तीच्या मैत्री शिबिरासाठी स्वयंसेवक सज्ज!
समर्पण प्रतिष्ठान आयोजित सांझाग्राम मैत्री शिबिर पर्व १०च्या नियोजनाला १५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. दर वर्षी मैत्री शिबिरासाठी स्वयंसेवकांची टीम नव्याने तयार करण्याची प्रक्रिया राबवली जाते. यासाठी मागील शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थींना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली जाते.
यावर्षी तब्बल ९२ शिबिरार्थींनी स्वयंसेवक होण्यासाठी नोंदणी केली. त्यानंतर विविध टप्प्यांमधून प्रक्रिया राबवून मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यातून ३९ नवीन स्वयंसेवकची निवड करण्यात आली.
या प्रक्रियेतून निवड झालेल्या स्वयंसेवकांची २० सप्टेंबर रोजी नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला प्रक्रियेच्या विविध टप्प्यांतून निवडून आलेल्यापैकी २० स्वयंसेवक उपस्थित होते.
सागर मिसाळ, प्रवीण आगरकर आणि सूरज देशमुख यांनी मागील वर्षीच्या मैत्री शिबिराचा आढावा घेत बैठकीची सुरुवात केली.
शिबिराची जबाबदारी पार पाडण्यासोबतच स्वतःचा विकास, विचारांमध्ये सकारात्मक बदल, टीमवर्क, जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव या महत्त्वाच्या पैलूंवरही विशेष चर्चा झाली.
दशकपूर्तीचे हे मैत्री शिबिर अधिक सुंदर, अर्थपूर्ण आणि संस्मरणीय कसे करता येईल, यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेतून आपला स्वतःचा विकास कसा साधता येईल, यावरही विचारमंथन करण्यात आले.
आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे २५ सप्टेंबर रोजी सांझाग्राम मैत्री शिबिर पर्व १०ची नोंदणी लिंक खुली होणार आहे.
दशकपूर्तीचे हे पर्व केवळ एक शिबिर नसेल…
तर सेवाधारी आणि सहभागी प्रत्येकाच्या आयुष्यात
एक नवा अनुभव, नवी मैत्री आणि नव्या विचारांची सुरुवात ठरेल!
शिबिर दिनांक : २१ ते २५ डिसेंबर २०२६
समर्पण प्रतिष्ठान
सांझाग्राम मैत्री शिबिर — पर्व १०