28/05/2026
चोंढी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चोंढी (शनिवार दिनांक 23 मे २०२६): सकल मराठा समाज्योन्नती युवा सामाजिक संस्था व सक्षम एज्युकेशन सोसायटी मार्फत दहावी व बारावीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने करिअर मार्गदर्शन शिबिर चोंढी येथील डिफेन्स अकॅडमी मध्ये आयोजित केले गेले होते. सदर शिबिरास तालुक्यातील सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहावी व बारावीचे मिळून सुमारे 160 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.
सकल मराठा समाजाचे युवा अध्यक्ष श्री समरेश शेळके तथा सक्षम एज्युकेशनचे अध्यक्ष श्री शार्दुल काठे यांच्या अध्यक्षतेखाली सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे मुख्य मार्गदर्शक श्री सुशील घरत सर यांनी मुलांना त्यांच्या इच्छा व कला गुणांचा योग्य समन्वय साधून कशाप्रकारे पुढील जीवनात यशस्वी कामगिरी करता येईल त्याच प्रमाणे नियोजनशील पद्धतीने आपल्या ध्येयांची आखणी केल्यास कसे यश मिळते याबद्दल मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने श्री शार्दुल काठे यांनी IT क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांची विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले. ज्या विद्यार्थ्यांना देश सेवा त्याच पद्धतीने मोठ्या सरकारी हुद्द्यांवर कार्य करण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांसाठी रिटायर्ड सैन्य अधिकारी माननीय श्री संतोष तावडे सर यांनी NDA तथा इतर भारतीय सैन्य दलाच्या सेवां संदर्भात मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी सकल मराठा समाज्योन्नती युवा सामाजिक संस्था आणि श्री प्रशांत अर्जुन मोरजकर व सौ. माधुरी प्रशांत मोरजकर यांनी निधी उपलब्ध करुन दिला. या कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.