25/01/2024
मेरे घर आई एक …. परी
आज गुरुपुष्यमृत योग. कसल्याही योगायोगावर खरं तर विश्वास न ठेवणारा माणूस मी.
पण आज एक वेगळीच घटना घडली.
खूप लोक मुहूर्तावर आपत्यप्राप्ती व्हावी म्हणून धडपडत असतात.
त्यासाठी नाही नाही ते उपाय करतात.
ती पोरकी.
महाराष्ट्राच्या कुण्या कोपऱ्यामधुन आलेली.
बरेच हौशी कार्यकर्ते हल्ली या विषयात काम करतात पण ते प्रसिद्धी पेक्षा फार थोडे असते !
अशाच कुणा कार्यकर्त्याने वाजतगाजत , फोटो व्हिडीओ काढत तिला आणले आणि तिची अकंदर अवस्था बघून आणि तिचे गर्भारपण बघून तिला माऊलीच्या मनगावी आणून सोडले.
तिला बिचारीला कुठलं घर की दार ?
आभाळ पांघरूण जगणं.
कुणीतरी या तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि ती गर्भार्षी राहिली. तिच्यासाठी कोण घर बांधणार ? तिला कोण जवळ करणार ?
माउलीच्या घरात ती आली. समजत उमजत काहीच नव्हत.
ती बेडशीट फाडून त्याचे धागे चगळायची. काहीही खायची….
आणि ती वेळ आली.
वेदना सुरू झाल्या. …
पण डायलेटेशन होत नव्हत. सीपीडी.
म्हणजे कंट्रॅक्टेड पेल्विस होत.
कोणत्याही परिस्थितीत सिझिरिन करणे गरजेचे होते. नेहमोप्रमाणे आमचे प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ. गणेश बडे आणि छायाताई बडे मदतीला धावले सायझेरियन झाल.
मुलगी झाली. ही आमची “ पूर्णिमा “
आमच धामणे माऊली कुटुंबाचं हे ४१ व मुल.
डॉ. राजेंद्र धामणे