02/04/2026
मोरया युवा प्रतिष्ठानचा पक्षी वाचवा अभियान
अहिल्यानगर: शहरातील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धिबाग येथील श्री.सिध्देश्वर देवस्थान परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून पक्ष्यांसाठी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच खाद्याचीही सोय करण्यात आली आहे. गुरुवार (दि.२) हनुमान जयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अहिल्यानगर शहराचे उपमहापौर धनंजय भैय्या जाधव, राजु मामा जाधव, आदिनाथ जाधव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर पवार, उपाध्यक्ष स्वामी टाकळकर आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
उन्हाच्या झळा वाढत असल्याने पाण्याची तहान भागवण्यासाठी आणि चाऱ्यासाठी पक्ष्यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना सुसह्य करण्यासाठी गरज आहे. शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढत्या उष्म्याचा परिणाम पशु-पक्ष्यांवरही होत आहे. पशु- पक्षी उष्माघाताने बळी पडत असल्याचे अनेक ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे.
निसर्गाने आपल्याला अनेक उपहार दिले आहेत. त्यात पशु-पक्षी हे एक महत्त्वाचे उपहार आहे. पशु-पक्षी निसर्गाचे एक अविभाज्य अंग आहे. ते निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत करतात. ते वनस्पतींचे बीज प्रसारित करतात, कीटकांचे नियंत्रण करतात आणि मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन निसर्ग स्वच्छ राखतात. पण आजकाल पशु-पक्षींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.
पशु-पक्षी कमी होण्याचे मुख्य कारण बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, वृक्षतोड, प्रदूषण, हवामान बदल, मोबाईलचे टॉवर, आणि इंटरनेटमुळे पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. वृक्षतोडमुळे पशु-पक्षींचे आवास नष्ट होतात. शिकारीमुळे पशु-पक्षींची संख्या कमी होते. प्रदूषणामुळे पशु-पक्षींचे स्वास्थ्य बिघडते आणि हवामान बदलामुळे त्यांचे आवास नष्ट होतात. मोबाईल रेंजमुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे चिमण्यांसह अनेक पशु-पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत.
पशु-पक्षी वाचवण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. वनस्पतींचे वृक्षारोपण करणे, पशु-पक्षींचे आवास संरक्षित करणे, शिकारीवर प्रतिबंध घालणे, प्रदूषण कमी करणे आणि हवामान बदल रोखणे यासारखे उपाय आपण करू शकतो.
अशा परिस्थितीत पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मोरया युवा प्रतिष्ठान पक्षी वाचवा अभियानच्या माध्यमातुन गेल्या सहा वर्षापासून कार्य करत आहे. याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने पक्षी वाचवा मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची गरज आहे. असे प्रतिपादन मोरया युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर पवार यांनी केले आहे. तसेच ‘जिथे घर, तिथे पक्षी पाणवठा’ ही संकल्पना राबविणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या परिसरात सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्ष्यांना आंघोळही करता येईल, असे भांडे असावे. पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करावी. विशेषतः ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शित व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवावे. ज्याने करून पक्ष्याना आधार मिळेल. असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्वामी टाकळकर यांनी व्यक्त केले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधेप्रमाणे इतर ठिकाणीही नागरिकांनी पक्ष्यांसाठी सुविधा कराव्यात. त्यामध्ये घर तसेच बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरून ठेवणे, शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसविणे, घराच्या परिसरातील गच्ची, बाल्कनीत पक्ष्यांसाठी खाण्याची सोय करणे, या सुविधा करता येणे नागरिकांना सहज शक्य असल्याचे मोरया युवा प्रतिष्ठानचे सदस्य हिमांशु साखला यांनी म्हटले आहे.
घरटी न तोडण्याचे आवाहन
शहरातील बहुतेक नागरिक हे साफसफाई करताना त्यांच्या घरात अथवा इमारतीतील पक्ष्यांची घरटी काढून टाकतात. त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकलेल्या या पक्ष्यांचा निवारा काढला जातो. निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने ते उन्हाचे बळी ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नये, शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावी, असे आवाहनही मोरया युवा प्रतिष्ठानचे शुभम टाकळकर, धिरज पोखरणा, मनोज लुनिया, दर्शन चनोदिया, सागर शर्मा, अतिश शिंगरे, गौर जाना, हिमांशू साखला, अंकुश गोयल, मयूर व्यास आणि सर्व सदस्याच्या वतीने करण्यात आले आहे.