05/09/2026
आमचे सीकेपी मेन्यूकार्ड
- सुनील कुळकर्णी, तळे, पुणे
चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंच्या विशेष खाद्यपदार्थांची सगळी माहिती देणारा हा लज्जतदार लेख सोशल मीडियावर सध्या फॉरवर्ड होत आहे. हा लेख आपल्याही वाचकांसाठी आम्ही देत आहोत. याचे लेखक श्री. सुनील कुळकर्णी यांची विशेष परवानगी देखील आपण घेतली आहे. यातील फोटो हे वनिताज कॉर्नर https://vanitascorner.com/ या वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत. कृपया या लेखातील पदार्थांचा तुम्ही सगळे सुद्धा आस्वाद घ्या.
आम्हाला मासे प्रचंड आवडत असल्याने आम्ही रोज फक्त मासे खाऊनच आमची उपजीविका करीत असणार असा आमच्या काही मित्रांचा समज झालेला आहे. खरेतर रोज मासे खाण्याची आम्हालाही प्रचंड इच्छा आहे..पण.. आमच्या इनमिन दोघांच्या घरातील मोजून पन्नास टक्के लोकसंख्या वनस्पतींचे विविध अवयव खाण्यासाठी आसुसलेली असल्याने खाण्याच्या बाबतीत आमचे फारसे काही चालत नाही!
तर मंडळी, ही अर्धी लोकसंख्या सुद्धा आमच्याच ज्ञातीतील असल्याने घरी जे काही बनते, ते बहुतेक वेळा पारंपरिक पद्धतीचेच असते. पिझ्झा किंवा नूडल्स घरी बनविण्याचे अनेक जीवावरचे प्रसंग आम्ही प्राणपणाने परतवून लावले आहेत! या विदेशी खाद्याची आम्हाला दहशत आहे. इटलीतून ताटलीत येणारी त्यांची रूपे पाहून आम्हाला गहिवर येण्यापेक्षा दहिवरच येतो! अगदी इटलीत गेलो असतानाही आम्ही तेथील मूळ चवीचे हे पदार्थ खावेत म्हणून आमचे धर्मपरिवर्तन करण्याचे प्रयत्न झाले, परंतु आम्ही अखंड हिंदुस्थानवादी असल्याने हिंदुस्तानी खाणे हा आमचा धर्म आम्ही सोडला नाही. तो पाद्री पिझ्झा खाण्यापेक्षा एका पाकिस्तानी रेस्टॉरंट मध्ये जाऊन आम्ही मूर्ग मुसल्लम चापणेच पसंत केले!! असो..
तर मंडळी, प्रत्येक ज्ञातीची आपली अशी काही खाद्य परंपरा असते. आणि थोर इतिहास संशोधिका आणि मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी सिद्ध केल्या प्रमाणे आपण ज्याला जात म्हणतो, तो वस्तूत: एकाच प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांचा एक जनसमूह असतो.. अगदी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकच काम करणारे लोक, उदाहरणार्थ कुंभार, सुतार हे त्याच जातीच्या नावाने ओळखले जातात! परंतु ती खरी जात नसते! खरी जात ही पोटजात असते. ज्यात बेटी व्यवहार होतात ती जात..!! त्यामुळे पोटजात हीच खरी जात असते. इंडोगॅमस.. म्हणजे ज्या समाज गटात आपसात लग्न होतात, आणि त्यामुळे या गटामधील सर्वजण लांब लांबचे का होईना परंतु एकमेकांचे नातेवाईक असतात, तो गट म्हणजेच जात..!! त्या दृष्टीने सी के पी ही एक पोटजात आहे ! मुळात चांद्रसेनीय हा समास चुकीचा आहे. त्यामुळे ते मूळचे चांद्रश्रेणीय प्रभू असावे. चिनाब आणि झेलम यांच्या चंद्रा आणि भागा या उपनद्यांच्या खोऱ्यात राहणारे ते चांद्रश्रेणीय .. कायस्थ हा कर्मवाचक जात समूह असावा आणि प्रभू हे विशेषण नंतर लागले असावे.. असे आपले आमचे मत आहे..!! असो..
तर अशा या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरे मध्ये पदार्थाची अंतिम चव ही महत्त्वाची असतेच, परंतु त्यासाठीचे धान्य, मांस, मासे यांची पारख करण्याचीही एक परंपरा असते. म्हणजे माशांचे ताजेपण हे कल्ले दाबून त्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याच्या रंगावरून सगळेच ठरवितात..! पण अस्सल सीकेपी, त्या माशाची चमक, रंगाची गडद छटा, माशाच्या डोळ्याचा रंग, शेपटीचा आणि पोटाचा ताठपणा, तोंडाचे वासलेपण, माशाचा गंध, त्याचा ॲपीअरन्स कसा आहे.. तो डोळ्याला कडक वाटतोय की, कोसळलेला दिसतोय, आणि त्या भोवती एखादा उपद्रवी कीटक फिरत आहे का.. या वरून तो उभ्या उभ्याच माशाची पारख करीत असतो! त्यासाठीचे जीन्स त्याच्या मध्ये आनुवंशिक पणे आलेले असतात. त्यासाठी त्याची घ्राणेंद्रिय सर्वसामान्य माणसापेक्षा अधिक तीक्ष्ण असतात. त्यामुळे सीकेपी रक्तात काही प्लेटलेट्स या माशांच्या खवलांनी बनलेल्या असतात असा पुढे मागे कोणी शोध लावला तर मला आश्चर्य वाटणार नाही!! असो.. जी गोष्ट माशांची तीच कडधान्याची. त्यातही चमक, रंग, रूप, आकार या गोष्टी फक्त डोळ्यांनी हेरणाऱ्या माताहारी इथे घरा घरात राहतात.. त्यामुळे फळभाज्या पालेभाज्या किती ताज्या हे ओळखणे हा त्यांच्यासाठी पोरखेळ असतो!
तर आता मूळ विषय.. आमचे मेन्यू कार्ड. त्यात आता कृष्ण जन्म अगदी दोन दिवसावर असल्याने आपण त्या रात्री वाटल्या जाणाऱ्या सुंठवड्या पासून सुरुवात करू.
सुंठवडा: सुंठवडा तोंडात टाकताच लागणारा ठसका हा तुम्हाला सीकेपी देवळात कृष्ण जन्माला दिल्या जाणाऱ्या सुंठवड्यात किंवा कीर्तनात दिलेल्या सुंठवड्यात लागणार नाही. आमचा सुंठवडा बिचारा आमच्या पुरुषांसारखाच मिळमिळीत असतो! ( खा आता शिव्या..!! ) कारण त्यानंतर रात्री उशिरा दिल्या जाणाऱ्या बटाटावड्याकडे मुख्य लक्ष असल्याने सुंठवड्यात सुंठ अंमळ कमीच घातली जाते. तिची भरपाई रात्री वाटल्या जाणाऱ्या बटाट्या वड्यात आलं जरा जास्तच टाकून केली जाते.
निनावं: श्रावण महिना संपला की हरितालिकेच्या आधी खाण्याचा वार बघून दाटा नामक एक जल्लोष साजरा होतो.. म्हणजे खाण्याचा जल्लोष.. पिण्याचा नाही.. यात मुख्यतः तळलेली कोलंबी, निनावं आणि माशांचे विविध प्रकारे केलेले पदार्थ मुख्यतः असतात. त्यातील आत्ता आपण पाहणार आहोत तो निनावं हा प्रकार..
मला नेहमी प्रश्न पडतो की कायस्थांच्या सुगरण आणि सौंदर्यवती, स्मार्ट आणि आधुनिक, फॉरवर्ड आणि..( आता बास..नाहीतर मार खावा लागेल) गृहिणींना या साध्या पदार्थाला नाव देता येऊ नये? त्याला चक्क निनावं असं नाव असावं ! कठीण आहे.. पण असो..
आता निनावं करण्याची करण्याची एक खास पद्धत आहे. श्रावणात जिवतीच्या समोर ठेवलेला नारळ फोडून त्यात आणखी दोन तीन नारळांचे घट्टसे दूध काढून त्यात सुरमट भाजलेल्या चण्याच्या डाळीचे घरी दळलेले पीठ घालून हा निनावं नामक प्रकार केला जातो.
तळलेली कोळंबी: आता तळलेली कोलंबी सगळेच करतात परंतु सी के पी गृहिणींचे कोलंबी तळण्यातलं वैशिष्ट्य म्हणजे लोखंडी तव्यावर चार भाकऱ्या टाकून झाल्यानंतर तव्याला जो ताव आलेला असतो, त्यावर टाकलेली कोलंबीची चव ही न्यारी असते. खाल्ल्याशिवाय त्यातला फरक कळणार नाही. आणि सीकेप्यांची तळलेली कोलंबी कधीही तिखट लागणार नाही. त्याला गोडसरच चव असणार. कांद्याचे प्रमाण थोडे जास्त असल्याने हे होते पण त्यामुळे खाण्याची लज्जत प्रचंड वाढते आणि मग हॉटेलमधली तळलेली कोलंबी आठवत नाही.
कोलंबीची खिचडी: सीकेपी मेन्यू कार्ड मध्ये कोलंबीची खिचडी घेतली नाही तर आमचे सर्व ज्ञाती बांधव मला बहिष्कृतच करतील. आम्ही कोलंबीचा पुलाव किंवा बिर्याणी करत नाही तर करतो ती कोलंबीची खिचडीच.. कारण आम्ही त्यात घालतो ते मुबलक नारळाचे दूध.. आणि त्यात मुक्त हस्ते उधळण असते ती उत्तम अशा ताज्या तडफडीत कोलंबीची. मग ती कधी खोल समुद्रातील सोलट असते, तर कधी टायगर प्रॉन्स, कधी समुद्राचीच लालभडक कोलंबी असते. नारळाच्या दुधामुळे त्या खिचडीला आलेला शाही स्वाद इतर कशानेही येऊ शकत नाही. त्यामुळे नाव जरी खिचडी असले तरी चव मात्र बिर्याणीच्या थोबाडीत मारेल अशीच असते!!
पंचामृत: काजू बदाम बेदाणे, खारीक, आणि खोबरं .. शिवाय बुटक्या गावठी मिरच्या याचे अतिशय पद्धतशीर प्रमाण घालून केलेलं आंबट गोड आणि तिखट चवीचे असे हे पंचामृत असते आणि सणावारी नैवेद्याचे जेवण असताना पंचामृताशिवाय कायस्थांच्या नैवेद्याचे ताट पूर्णच होऊ शकत नाही!
बिरढ्याची आमटी: का कोण जाणे परंतु सीकेपी म्हटले की बिरढ्याची आमटी आठवणारच. आणि सुखं बिरढं म्हणजे तर मक्तेदारीच. आता बिरढ्याची आमटी सगळेच ज्या पद्धतीने करतात तशीचआम्ही करतो फक्त फरक एवढाच की ते बिरढे
झाकण न ठेवता गॅसवर शिजवणे.. आणि हरवस न होण्यासाठी त्याला लावलेले कायस्थांचे स्पेशल वाटण हेच ते वैशिष्ट्य आहे. मुळात बिरढे दोन दिवस आधी भिजत घालणं.. ते बिरढ्याचं भलं मोठं पातेलं समोर घेऊन ते सोलण्याचा जीवघेणा कार्यक्रम एक दीड तास करणे आणि नंतर त्याची आमटी किंवा सुखं बिरढं करणे म्हणजे कर्म कठीण! त्यातून कायस्थांच्या घरी सोमवार आणि गुरुवार बिरढ्याची आमटी असणार हे नक्की असते कारण मच्छी शिवाय खाण्याचा शाकाहारातला तो सर्वोत्तम प्रकार असे तमाम कायस्थ पुरुष समजतात..!!
मसुराची आमटी: हल्ली हायवे च्या कडेला जी काही रेस्टॉरंटस, धाबे, टपऱ्या, खानावळी आणि अगदी मोठी हॉटेल झाली आहेत त्याच्या समोर एक मोठा बोर्ड हमखास दिसतो, आख्खा मसूर.. किंवा मसुराची उसळ. बाहेर हे सुरू होण्याआधी कायस्थांच्या घरी पिढ्या न पिढ्या मसुराची आमटी केली जाते. तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिला लावलेलं वाटण! मसुर भिजत घालून दुसऱ्या दिवशी उपसून तिला मुख्यऱ्या येतात न येतात..तोच तिची आमटी करायची. याची रेसिपी सेम मटणा सारखी फक्त यात थोडासा गुळ आणि कोकम घातले जाते. मसुराची आमटी आणि वडे, म्हणजे कोंबडी वाड्यातले वडे.. हे कॉम्बिनेशन अप्रतिमच असते..आणि लागते!
गोडं वरण: गोडं वरण हे सणासुदीला अत्यंत आवश्यक मानलं जातं. त्याशिवाय माझ्यासारखे काही कायस्थी अपवाद असतात, ज्यांना आंबट वरणापेक्षा गोडं वरण जास्त आवडतं. आता गोड्यावरणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते भाताच्या मुदी वरून पाण्यासारखे ओघळता कामा नये. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जर ती गृहिणी मुरुडची असेल तर त्या वरणामध्ये ओल्या नारळाचा एक पिळा नक्की असणारच..!! आणखी एक.. समग्र कायस्थ्यांच्या गोड्या वरणात गुळ नसून साखर असते...!!
सांदणी: आता सांदणी हे नावच इतकं अद्भुत आहे की ते जगात सी के पी सोडून कुणालाही माहित असण्याची शक्यता नाही. कारण तुम्ही गुगल व्हॉईस मधून टाइप करताना सांदणी सांगितलं की ते चांदणीच लिहितं.. !! आता या पदार्थाचे नाव सांदणी का ठेवले असावे हा एक संशोधनाचाच विषय आहे. अर्थात एक शक्यता अशी आहे, की ही सगळी नावे मराठी नसून आमच्या पूर्वजांच्या भाषेशी जोडलेली असावीत. अन्यथा मराठी मध्ये ज्याला काही अर्थ लागत नाही असे नाव एखाद्या पक्वानाला ठेवणे कठीण वाटते. सांदणी ही गौरीच्या दिवशी मुख्यतः केली जाते. कदाचित सांदणी सगळेच करत असतील.. परंतु अस्सल सीकेपी घरी, बाजारातून पारखून आणलेला आंबेमोहोराचा तांदूळ स्वच्छ धुऊन तो वाळवून, त्याचा भरडा काढून केलेली सांदणी हेच सीकेप सांदणीचे वैशिष्ट्य..!!
साखरभात/नारळीभात: सीकेपी लोकांच्या साखर भाताचे वैशिष्ट्य म्हणजे नारळाचे दूध आणि साखर यांचे इथे एकत्र मिश्रण असते! वास्तविक नारळ आणि गूळ यांचा नारळी भात.. किंवा साखर भातात फक्त साखर असंच सगळीकडे असतं!
अळू वडी: अळूवडी हा पदार्थ तर आता सर्व मराठी आणि अमराठी उपहारगृहात हमखास मिळणारा पदार्थ झाला आहे. त्यामुळे अळूवडीची चव महाराष्ट्रातील प्रत्येक खवय्याच्या जिभेवर व्यवस्थित बसली आहे. तरीही सीकेपी पद्धतीच्या अळूवड्या या वेगळ्या असतात. कारण इथे सी के पी पद्धतीचे वाटण त्याची सर्व चव ठरवीत असते. अळूवडी करण्यासाठी अगदी बेताची वाढलेली पाने घ्यावी लागतात. कोवळी किंवा जून पाने टाळावीच लागतात. नाहीतर ती चव येत नाही. तळलेले वाटण घातलं की चवीत फार काही फरक पडतो असं नाही. फक्त ते सांगितलं की जरा वेगळेपण दिसतंय एवढंच..!!
मसालेभात: आता मसालेभात हा वेगळा काय असणार.. आणि त्यातही पुण्यासारख्या ठिकाणी तर लग्नात मिळणारा मसालेभात हा एक जिओ टॅग प्राप्त पदार्थ झाला आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा चांगला मसालेभात आमचा असतो असे म्हटले तर पुणेकर ही गोष्ट हसण्यावारी नेतात..! तरीही आम्ही म्हणतोच की आमचा मसालेभात एकदा तरी खाऊन पहाच. याचे कारण त्यात असलेल्या सगळ्या अतिशय प्रमाणबद्ध गोष्टी. हे प्रमाण जरा इकडे तिकडे झाले की मसाले भाताची मटारची खिचडी व्हायला वेळ लागत नाही..
चवाचे कानवले: चवाचे कानवले हे खास गणपती मध्ये केले जातात. त्याशिवाय जिवतीच्या पाठवणीला खीर पुरी आणि चवाचे कानवले हे असलेच पाहिजेत असा एक अलिखित नियम आहे ! हे कानवले म्हणजे ओल्या नारळाच्या करंज्या नाहीत हे इतरांनी आवर्जून लक्षात ठेवावे.. बारा महिने जोशी स्वीट किंवा जोशी किचन मध्ये मिळणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्या, आणि आमचे हे चवाचे कानवले या दोन्ही गोष्टी पूर्ण भिन्न आहेत आणि हे त्यांची चव चाखल्याशिवाय कळणार नाही !!
तांदळाची खीर: खीर हे तर प्राचीन मराठी पक्वान्न. परंतु सीकेपी लोकांची खीर हे आणखी वेगळे प्रकरण आहे. मुठभर बासमती तांदूळ धुऊन वाळवून तव्यात थोडासा भाजून त्याचा रवा काढून तो शिजवून, आटलेल्या दुधात घालून, त्यात साखर घालून केलेली ही खीर, सर्वपित्री अमावस्येला सीकेपी घरात असणारच!! आणि ती खास काऊ साठी केलेली असली तरी घरचे सगळे ती बोटे चाखत खाणार हे ही नक्की !!
नवरात्रातील सवाष्णी: वास्तविक ही काही एक डिश नाही. परंतु नवरात्रा मध्ये सीकेपी घरामध्ये ज्या सवाष्णी घातल्या जातात त्या अतिशय म्हणजे अतिशयच वेगळ्या असतात. त्या जेवणाच्या सवाष्णी नसतात. परंतु त्याच्या साधारणतः चौपट खर्च येईल एवढ्या महागड्या असतात. कारण या सवाष्णींना सुकामेवा म्हणजे काजू, बदाम, मनुका, बेदाणे, अंजीर, अक्रोड, खारीक, हा सुकामेवा साधारणतः प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पिशवीमध्ये घालून नंतर त्यात पेढे घालून त्या व्यवस्थित पॅक करून, शिवाय पिशवीत पाच प्रकारची फळे आणि मूठभर लाह्या घालून हे वाण त्या नऊ किंवा अकरा सवाष्णींना सन्मानपूर्वक दिले जाते. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खास या सवाष्णीं साठी राखून ठेवलेल्या चांदीच्या खास पेल्यात..जे त्या दिवशी काढून नीट घासून पुसून ठेवलेले असतात त्याच्यामध्ये केशरयुक्त अटीव दूध देऊन हा सोहळा पार पाडला जातो. सीकेपी कुटुंबात नवरात्रीमध्ये केला जाणारा सवाष्णींचा सन्मान हा अत्यंत आगळावेगळा आणि बहुदा महाराष्ट्रातील एकमेव असा असावा. पुण्यात आम्ही जेव्हा नवरात्रात सवाष्णींना बोलावतो, तेव्हा जेवायचं नाही म्हटल्यावर त्या एकदम हिरमुसल्या होतात.. परंतु पुढचा सगळा थाटमाट पाहिल्यावर मात्र हरखून जातात!!
बोरं आणि खजुऱ्या: पितरांची खीर करून दमल्यानंतर आणि मग जीव तोडून नवरात्रातील हळदी कुंकू समारंभ करून थकलेल्या सीकेपी गृहिणींना समोर उभ्या ठाकलेल्या दिवाळीने पार मेटाकुटीस आणलेले असते. दिवाळीच्या फराळाची सुरुवात मात्र होते ती एका आगळ्यावेगळ्या सीकेपी पदार्थाने.. पहिली केली जातात ती बोरे ..काकडी किसून केलेली ही बोरं बहुतांशी ठिकाणी कालबाह्य झाली असली तरी अजूनही कायस्थांच्या फराळाची सुरुवात मात्र बोरांनीच होते!! या बोरांसारखाच काळाच्या पडद्याआड गेलेला दुसरा पदार्थ म्हणजे खजुऱ्या.. गुळाचे पाणी उकळवून ते थंड झाल्यावर, त्यात बेसन, कणिक आणि तांदळाचे पीठ घालून थोडे तुपाचे मोहन घालून मऊसर गोळा करून त्याच्या वड्या पाडायच्या. या खजुऱ्या म्हणजे शंकरपाळ्यांची चुलत बहीण असे आपण म्हणू शकतो..!!
खाजाचे कानवले: खाजाचे कानवले हा चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या फराळातील एक अतिशय सन्माननीय असा पदार्थ आहे. करायला अतिशय सोपा असा हा पदार्थ आहे.. !! म्हणजे पहा..अगदी थोड्या वेळात.. म्हणजे तीन तासांमध्ये साधारणतः वीस कानवले होतात..! म्हणजे हा पदार्थ किती सोपा असेल त्याची आपण कल्पना करू शकतो! दुधामध्ये रवा, मैदा दोन-तीन तास भिजवून, नंतर मनसोक्त कुटून ..जणू काही नवऱ्यालाच खलबत्त्यात घातलाय अशा तऱ्हेने त्याच्यावर सगळा राग काढून त्याला पार गलित गात्र केल्यावर त्याच्या पातळ पोळ्या लाटून, त्यावर साटं लावून.. मग त्याच्या लाट्या करून त्याचे कानवले करणे हा महाभयंकर उपदव्याप ज्या सुगृहिणी करतात त्यांना कायस्थभूषण या पुरस्काराने दिवाळी संपल्यानंतर गौरवले जाते!! काही भयंकर उपद्व्यापी महिला त्यातही साध्या पांढऱ्याशुभ्र कानवल्यांऐवजी रंगीत कानवले.. आणि ते ही गुलाबाच्या फुलांचे आकार, उकार, विविध रंग असलेले करतात...!! अर्थात हे करणे म्हणजे त्या गृहिणीने आपल्या नैपुण्याने कायस्थभूषण किताबाच्या पलीकडे जाऊन कायस्थ रत्न हा भारतरत्न योग्यतेचा किताब मिळवण्यासारखे असते !! अर्थात असे कानवले महाराष्ट्रात घराघरात केले जातात पण त्यातील आतल्या सारणाची आमची खासियत ही वेगळी असते.
पुरणपोळी: सीकेपी घरात नुसती पुरणपोळी होत नाही.. तर ती तेलपोळी होते. म्हणजे पुरणपोळी मध्ये पीठ पोळी आणि तेलपोळी असे दोन प्रकार असतात. एकूणच सीकेपी महिला या कायम रिकामटेकड्या असल्याने त्यांनी गोडधोड पदार्थांच्या अशा काही कृती शोधून काढल्या आहेत की एक एक पदार्थ करताना मी मी म्हणणाऱ्या सुनेने हात टेकावेत! आणि सुसरबाईची पाठ किती मऊ असे सासूबाईंचे गोडवे गावेत.. असा प्रकार असतो! वास्तविक सीकेपी स्त्रिया दिवस रात्र स्वयंपाक घरात स्वतःला कोंडून घेत असतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या असल्या पाककृती..!! आता उदाहरणार्थ पुरणपोळी ही अगदी साधी, जशी देशावर करतात तशी केली तर काय बिघडलं? पण नाही.. आमच्याकडे तेलपोळीच असायला पाहिजे. म्हणजे पीठ भिजवून ते तेलामध्ये बुडवायचे.. अगदी आकंठ बुडवायचे.. तेलात भिजवलेल्या त्या पिठाची लाटी करून त्यात दुप्पट पुरण भरून केलेला उंडा तेलावरच लाटून मग लाटण्यावर अलगद घेऊन, ती लाटण्यावरची घडी तव्यावर अलगद सोडता येणे म्हणजे कायस्थी सून होण्याची पूर्ण पात्रता अंगात भिनवणे होय..!!
शीतला सप्तमी: अपभ्रंश.. शीळ सप्तमी..शीतळा सप्तमी.. मुलांना शितळा सप्तमीचे वाण देणे ही प्रथा फक्त कायस्थांकडेच असावी. या वाणामध्ये अळूच्या वड्या, निनावं, सांदणी, आणि काही भाज्या असतात. बाकी प्रथा म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे.. डिश म्हणून यात विशेष काही नाही!
मच्छीचे कालवण: कायस्थ आणि मासे असं म्हणणं फार फार चूक आहे, कारण हे दोन्ही एकच आहेत !! येथे दुजाभाव नाही! कायस्थांचा आत्मा माशा मध्ये विलीन झालेला असतो, की माशाचा आत्मा कायस्थांमध्ये विलीन झालेला असतो याबद्दल अजूनही मतमतांतरे आहेत! परंतु एक नक्की, की दोन्ही एकच आहेत! आता मच्छीचे कालवण ही महाराष्ट्राची एक सामान्य डिश आहे. परंतु सीकेपी स्वयंपाक घरातून आलेलं माशाचं कालवण हे सर्वोत्तम समजलं जातं ! आणि जातेच.. इथे चॅलेंज नाही!! ते का, तर प्रत्येक माशाच्या प्रकारावरून त्याला कोणते वाटण लावायचे ते ठरत असते. म्हणजे ओल्या बोंबलाचे कालवण आणि पापलेटचे कालवण, किंवा कोलंबी, मांदेळी, हलवा, रावस, सुरमई या प्रत्येक माशाला जे वाटण लावलं जातं, त्यातले इन्ग्रेडियंट्स आणि त्याचे प्रमाण अगदी वेगवेगळे असतात हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही..! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इतरांसारख्या उकळत्या पाण्यात म्हणजे कालवणात त्या तुकड्या सोडत नाही.. तर हळद तिखट लावलेल्या तुकड्या फोडणीला टाकून त्या चांगल्या सवताळून मग त्यात वाटण घालून कालवण उकळवायचे.. म्हणजे त्या तुकड्यांनाही जी काही चव लागते ना, ती फक्त कायस्थांच्याच नशिबात असते. बाकी वेगळं काहीच नसतं..!!
वडीचे सांबार: लहानपणी आई वडीचे सांबार करणार आहे म्हटली की माझ्या डोळ्यासमोर ते हरिण जातीतलं सांबर उभं राहायचं. वडीचं सांबार म्हणजे पाटवड्यांचाच एक प्रकार असून, सीकेपी गृहिणी त्यात नारळाचे दूध घालून त्याची लज्जत आणखी वाढवतात..आणि म्हणून ते आमचं वैशिष्ट्य असं समजायला हरकत नाही!
शेवळाची भाजी: शेवळाची भाजी हे पावसाळ्यात मिळणारे एक वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. खरंतर सी के पी कुठल्याही पदार्थात सोडे घालतात. अगदी सीकेपी घरातील कांदे पोहे सुद्धा सोड्यांनी सजलेले असतात. तसेच फ्लॉवरची भाजी, अल्कोलची भाजी, याच्यामध्ये सोडे घातल्याशिवाय सिकेप्यांना चैन पडत नाही. वास्तविक शेवळाच्या भाजीत विशेष काही नसतं.. त्याच्यात जर सोडे, कोलंबी, अंबाडी, किंवा खिमा टाकला नाही तर तिला काडीची चव लागणार नाही असं आपलं मला वाटतं..!! तर या भाजीत नान्याचा पाला नामक एक पाला, किंवा तो नसला तर आवळ्यासारखे दिसणारे एक रानफळ, ज्यांना कुडके म्हणतात, ती घालून ही भाजी शिजवावी लागते, म्हणजे ती खवखवत नाही. आमच्या लहानपणी अक्षरशः दोन दोन दिवस ही भाजी वैल.. आता वैल म्हणजे काय हे नवीन पिढीला सांगणे कठीण आहे.. परंतु चुलीच्या मुख्य मुखाच्या.. म्हणजे जिथे आपण लाकडे घालतो, त्याच्या बाजूला चार टेंबुक असलेली जी एक बाजू असते त्याला वैल असे म्हणतात. तर त्यावर अगदी मंद आच लागते. म्हणून त्यावर दोन दोन दिवस ती भाजी ठेवून अगदी तिची खाज साफ मोडून ती खाण्यालायक केली जात असे. आजही कोकणातील सिकेप्यांच्या घरी शेवळाची भाजी केली जाते.. परंतु ती गॅसवर !!
मंडळी या आहेत सीकेपी लोकांच्या आवडीच्या डिश. म्हणजे त्यांच्या मेनू कार्ड मध्ये हमखास असणारे हे पदार्थ आहेत. त्याशिवाय सोडे घालून भरली वांगी, शेवळाच्या रुमाली वड्या, चिंबोरीचे कालवण, खांडवी, जवळ्याची भजी, गुळपापडीच्या वड्या, भरली केळी, शेकटाच्या शेंगांचे शेंगवणी..अशा अनेक डिश या मेन्युत घेता येतील. शब्द मर्यादेमुळे त्या घेतल्या नाहीत.
या विषयावर मी कधीतरी लिहीन असे मला चुकूनही वाटले नव्हते..परंतु माझे रोह्याचे मित्र श्री. सचिन कुळकर्णी यांनी मला हे सुचविले..खरे तर लिहिण्यास उद्युक्त केले. म्हणून हा उपद्व्याप मी केला..असो..
आता हे एवढं सगळं मी लिहिणं कसं शक्य आहे? हा अत्यंत उचित प्रश्न माझ्या मित्रांना पडला असेल.. तर मित्रहो.. तुमचा अंदाज खरा आहे.. यातील शब्दांकन सोडता माझे कर्तृत्व शून्य आहे. जे आहे ते आमच्या दोघांच्या घरातील त्या उरलेल्या पन्नास टक्के लोकसंख्येचे हे श्रेय आहे! आम्ही केवळ नावापुरते.. असो..
- श्री. सुनील कुळकर्णी, तळे, पुणे
लेखाचा दिनांक :- २ सप्टेंबर २०२६
#चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभु #सीकेपी #सीकेपी_पदार्थ