15/10/2025
सोलापूर - माढा Activity - 11 th October 2025
असं म्हणतात की निसर्गपुढे कोणाचे काही चालत नाही. निसर्ग कोपला तर माणूस त्या समोर हतबल होतो. मग त्यात अनेक सामान्य माणसेही भरडली जातात. याचं प्रत्यक्ष उदाहरण आम्हाला आज बघायला, अनुभवायला मिळालं.
दोन आठवड्यांपूर्वी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात पूर आला आणि पिकांचं, गाईगुरांचं खूप नुकसान झालं. ते सगळं बघितलं आणि मन सुन्न झालं. आज पूरग्रस्तांसाठी धान्याचे किट वाटायला माढा तालुक्यातील दारफळ आणि वाकाव या दोन गावांमधील काही वस्त्यांमध्ये आम्ही गेलो होतो. दोन आठवड्यांपूर्वी प्रचंड पाऊस असलेल्या ठिकाणी आज रखरखीत ऊन होतं. आठवड्यापूर्वी पाऊस थांबला पण आधीच्या पावसाचा तडाखा इतका होता की अजूनही वस्त्यांमध्ये, पिकांमध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसत होते.
जेव्हा पूर आला तेव्हा लोकं आहे त्या कपड्यानिशी जे घर सर्वात उंच होते तिथे जाऊन थांबले. जी गुरे पाण्यावर दिसत होती तेवढ्यांना त्यांना बाहेर काढता आले, बाकीची वाहून गेली. केळी , ऊस ही पिके अजूनही त्या चिखलात रुतलेली दिसत होती. सगळं गेलं पण जीव वाचला हे एकच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आम्ही जेव्हा त्यांना धान्य दिलं तेव्हा त्यातल्या एक मावशी म्हणाल्या की तोच सर्व नेतो आणि तोच पुन्हा देतो त्याचे आभार. म्हणजे इतकं नुकसान होऊनही काहींमध्ये सकारात्मकता दिसत होती. काही लोकांनी 'आता धान्य पुरेसे मिळाले आहे पण मुलांच्या शाळा पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करा' असे आम्हाला कळकळीने सांगितले.
अन्नधान्याची मदत करण्याची इच्छा व्यक्त करणारे पराडकर सर, त्यांचे सहकारी आणि त्यांचा विद्यार्थी संघ यांच्या प्रयत्नांनी सगळी आर्थिक मदत जमा केली गेली. तिकडचा सर्वच भाग आम्हाला नवीन असल्यामुळे आपण दिलेली मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचावी ही अपेक्षा होती आणि सौ स्मिता कोर्टीकर तसेच राष्ट्रीय सेवा भारती व अनुलोमचे किरण चव्हाण व महादेव करांडे यांच्या मदतीने ते शक्य झाले.
हे सगळं बघून असं वाटलं की निसर्गाने जे दिलं आहे ते ओरबडून घेण्यापेक्षा त्याचा आपण आपल्या परीने हवा तितकाच उपयोग करावा आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. वीर सावरकरांच्या ओळी येथे नमूद कराव्या वाटतात "देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो. आणि या देशाचे आपण देणे लागतो."