15/03/2026
*युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न*
पुणे, १५ मार्च २०२६ :युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी. एन. देशपांडे आणि डॉ. विनोद डोंबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याद्वारे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बीएएमएस परीक्षेत उत्तीर्ण तसेच संस्थेच्या मोफत UPSC व MPSC मार्गदर्शन व शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम हडपसर, पुणे येथील टेरेट्री रेस्टॉरंट येथे पार पडला.
या वेळी बीएएमएस अंतिम परीक्षेत विद्यापीठात प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या डॉ. तनया काळे, डॉ. ऋतुजा भाकरे आणि डॉ. ऋषिकेश पराड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या डॉ. ऋतुजा भाकरे (कायचिकित्सा) आणि डॉ. गजानन कुलकर्णी (शल्यतंत्र) यांचा देखील सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या मार्गदर्शनाखाली UPSC परीक्षा २०२४-२५ मध्ये यश मिळवलेल्या श्री. मनोज पाटील, श्री. धनंजय दिघे, श्री. अल्पेक्ष ढवळे आणि श्री. हेमकृष्ण पिसदे यांचा तसेच MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या श्री. मंगेश सुरुशे आणि श्री. चेतन वंजारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच CAPF परीक्षेत यश मिळवलेल्या श्री. अनुप द्विवेदी, श्री. भुवनेश काबळे आणि श्री. निखिल वसइकर यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला डीआयजी श्री. प्रकाश रेड्डी, सीबीआय डीआयजी सारा शर्मा, पुणे पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख डॉ. विनोद गायकवाड, डॉ. महेश दळे आणि डीआयजी (नारकोटिक्स) अधिकारी डॉ. केतन पाटील,जयश्री देसाई एसपी , श्री सोहम मांढरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. प्रकाश रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
सीबीआय डीआयजी सारा शर्मा यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत जिद्द आणि चिकाटीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
डॉ. विनोद गायकवाड यांनी परदेशातील आयुर्वेदाची स्थिती आणि भविष्यातील संधी याबाबत माहिती दिली. स्पर्धा परीक्षांबरोबरच इतर क्षेत्रांचा विचार करून कौशल्य विकासाकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
डॉ. महेश दळे यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. केतन पाटील यांनी UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये “पास किंवा नापास” असा प्रकार नसून “सेलेक्शन किंवा नॉन-सेलेक्शन” असा विचार करावा, अपयशामुळे खचून न जाता जागतिक स्तरावर करिअरच्या संधी शोधाव्यात, असे मत व्यक्त केले.
जयश्री देसाई मॅडम यांनी विदयार्थ्यानी सातत्य टिकवण्याची गरज व्यक्त केली. श्री सोहम मांढरे यांनी युवा परिवर्तन हे शिक्षण, पर्यावरण व आरोग्य यांच्यातून घडत आहे असे मत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या मार्गदर्शनातून आतापर्यंत UPSC मध्ये २५, CAPF मध्ये १३ आणि MPSC मध्ये १५ असे एकूण ५३ विद्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडले गेले आहेत. तसेच आतापर्यंत ८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून मॉक इंटरव्ह्यू, वन-टू-वन मार्गदर्शन आणि विविध प्रशिक्षण सत्रांद्वारे जवळपास २०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन आणि आर्थिक मदतीबाबतही त्यांनी माहिती दिली. युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. प्रबोध कुमार हे चीफ मेंटर म्हणून मार्गदर्शन करत आहेत. संस्थेचे विश्वस्त डॉ. समीर ननावरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. संस्थेचे संचालक डॉ. कल्पेश वाणी, डॉ. सोनल भालेराव, डॉ. सुरज इगवले, तसेच डॉ. पुस्तके, डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचलन संस्थेचे संचालक डॉ सोनल भालेराव यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ कल्पेश वाणी यांनी केले