23/09/2026
कोणत्याही संस्थेत विविध मुद्द्यावर सामाजिक बदलासाठी काम करणारे कार्यकर्ते देखील त्याच समाजाचा भाग असतात. त्यामुळे समुदायाच्या इतर मुद्द्यांवर काम करण्यासोबतच आपल्या कार्यकर्त्यांवर देखील सातत्याने काम करणे तितकेच गरजेचे असते. याच उद्देशाने समाज प्रगती सहयोग संस्थेच्या पंधरा ही लोकेशनमधे काम करणाऱ्या सर्व स्टाफसोबत समाजबंध मागील वर्षापासून काम करत आहे. मासिक पाळी व्यवस्थापन आणि जेंडर याविषयी स्टाफची समज, संवेदनशीलता, सहजता आणि सहकार्य वाढवणे या उद्देशाने एक दिवशीय प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा नव्या मोड्युलसह सुरु आहे. त्यातील कांटाफोड आणि कन्नोद या लोकेशनमधील प्रशिक्षणाचा अनुभव ही भन्नाट राहिला. दोन्ही ठिकाणी ३० च्या आसपास सहभागी होते. प्रत्येक गटात एखाद दुसरी महिला आणि चार पाच पुरुष होते आणि प्रत्येक गटाला चार वेळा पाळीला घेऊनच चार वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा करायच्या होत्या. पण महिलाही आपल्याच सहकाऱ्यांसोबत पहिल्यांदाच न लाजता आपला वैयक्तिक अनुभव शेअर करत होत्या. पुरुषही संवेदनशीलपणे ते समजून घेत होते, मुद्दे लिहून घेत होते आणि शेवटी सादरीकरणही करत होते. मागील प्रशिक्षणानंतर वातावरणात झालेला बदल, सहजता लक्षात येत होती. या प्रशिक्षणानंतर पुरुष-महिला स्टाफ पाळीतील कोणत्याही महिलेसाठी आणखी सहकार्याच्या भूमिकेत जातील आणि समता भाव ठेवून सर्व घटनांकडे पाहतील अशी अपेक्षा आहे.
#समाजबंध