27/03/2024
वयोवृद्ध आजारी शेतमजूर पती पत्नीला मिळाले माऊलीच्या मनगावी कायमचे घर
चार दिवसांपासून राहुरीच्या बस स्थानकात आपल्या सख्या मुलीने आणि जावयाने आणून सोडलेल्या वयोवृद्ध पती पत्नीला माऊलीच्या मनगाव प्रकल्पात कायमस्वरूपी घर मिळाले.
व्यवस्थेतील तळाचा माणूस अजूनही जगण्यासाठी धडपडतो. प्रसंगी जगण्याच्या वेदना असह्य झाल्या की त्यातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी स्वस्त झालेल मरण पत्करू लागतो. अशीच काहीशी कहाणी आहे एका शेतमजुराच्या आयुष्याची.
एका बड्या बागायतदाराच्या शेतीवर तब्बल पन्नास वर्षे दोघानीही सालाने काम केले.आपली सगळी हयात दुसऱ्याच्या वावरात राबत राबत आयुष्यभर वंचितच जगण्यात घालवली.ऐकुलता एक पोरगा कधीतरी परागंदा झाला. एक लग्न झालेली मुलगी. ती तिच्या घरी नांदते.
उमेदच्या काळात दोघांनीही शेतीचं प्रचंड काम केलं.गुर राखली,दिवसरात्र शेतीला पाणी दिलं.पेरणी केली,मशागत केली आणि आपल्या मालकाला भरघोस उत्पन्न मिळवून दिलं.
स्वतःच घर,वावर शिवार काहीच नसल्यानं जिथे आसरा आणि निवारा मिळाला तिथे मनापासून,प्रामाणिकपणे काम केलं.या राबण्याच्या आणि पोटाची खळगी भरण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्यात बिघाभर जमीन घेता आली नाही की म्हातारपणी स्वतःच घर असाव म्हणून विचार करुन काही करता आलं नाही.
गावगाड्याच्या पसऱ्यात येथील आत्ममग्न समाजात कष्टाचं जगणारे हे नवरा बायको उपेक्षितच राहिले आणि तसेच जगले.
वय वाढत गेलं तस वावरा शिवारातल कष्टाचं काम पेलवेना.
कुणीतरी सुचवलं म्हणून एका वृद्धाआश्रमात राहायला गेले.तीनचार महिन्यानंतर तिथूनही बाहेर पडावं लागलं.
आपला पोरगा जरी नालायक निघाला तरी लेक सांभाळील या आशेने हे दोघं लेकीकडे गेले.
दरम्यान आजीला अतिरक्तदाबामुळे अर्धांगवायु झाला.लेक जावयानं काही दिवस बघितलं आणि त्यांचीही परिस्थिती म्हणे नाजूक होती. त्यामुळे आजी आजोबाला आणून राहुरीच्या बस स्थानकात आणुन सोडल.
इथे पार्सल ऑफिसजवळ दोघंही विमनस्क बसून होते.
आयुष्यभर मानानं,कष्टान जगलो आणि आता आपल्यावर ही वेळ का आली याचा विचार करत या आस्रप जीवांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हत.
कुणी कुणी फोटो काढून त्यांची व्यथा बघून हळहळत होत आणि ते फोटो इतराना पाठवून त्यांनाही हळहळायला लावत होत...त्यांची स्टोरी विचारुन त्यांच्या पोराना कचकून शिव्या देत होते....इतकच..
कुणीतरी रात्री त्यांना दोन दणके देवून त्यांच्याकडचे पाच पन्नास रुपयेही काढून घेतले.
आयुष्यभर कष्टाची भाकरी खालेल्या या जीवांना पोटासाठी त्या चार दिवसात कुणा कुणापुढ हात पसरावे लागले...ते त्यांच्या जास्त जिव्हारी लागत होत.
आजोबा हबकून गेलेले.या अशा जगण्यापेक्षा मरण आलेल बर अश्या निराश मनोअवस्थेत.
त्यांना माउलीच्या मनगावी आणलं तेव्हा आजीचा रक्तदाब २०० पार झालेला होता. अर्धांगवायु वर कुठलाच उपचार झाला नसल्याने एक बाजू पूर्णपणे लुळी पडलेली.
तिच्यावर माऊलीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले.
दरम्यान आजीला छोटासा र्हुदयविकाराचा झटकही येवून गेला.परंतु त्या अतिदक्षता विभागात असल्याने तातडीने प्रोटोकॉल प्रमाणे उपचार झाले आणि आजी बरी झाली.अर्थात अर्धांगवायूने आलेले अपंगत्व इतक्यात जाणार नाही.फिजियो थेरपीने हळू हळू फरक पडेल.
आजोबा मनगावमध्येच बाहेरच्या एका खोलीत राहतात. कष्टाची सवय असल्याने इथल्या बागेत शक्य होईल ते काम करतात. झाडांना पाणी देतात. मावळतीचा कालखंड आता बरा जाईल.घर आणि मन हरवलेल्या माणसांच्या गावी “मनगावी” ते आलेत ही जमेची बाजू.
या जगात खूप माणस अशी आहेत की त्यांच्या घरा वावरा शिवाराच्या गोष्टींच्या दंतकथा झाल्या.कुणी चार माणस असणाऱ्या कुटुंबाला पन्नास खोल्याच्या हवेल्या बांधल्या,कुणाच्या वावरांची शेकडो एकर जमीन अशीच पडून आहे.
बदलत्या समाजात माणस खूप पशेवाली श्रीमंत झाली.पण सामान्य कष्टकरी अजूनही टाचा घासून घासून कधी मरण येईल याची वाट बघतो आहे.
कोर्ट या मराठी चित्रपटातील कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी असणारा शाहीर (दिवंगत वीरा साथीदार) म्हणतो,
कठीण आला काळ
मातीशी तुटे नाळ,
युगाचा अंध खेळ,
डोळेच केले गहाळ.
सावात दिसे चोर,
घुबडात दिसे मोर,
लहानात दिसे थोर,
थोरात दिसे पोर.
मनगावी घर आणि मन हरवलेल्या माणसाला जगण्यासाठी हव ते सगळं आहे.शेवटी शांतपणे समाधानाने जगण्यासाठी काय हव असतं? प्रेम आणि माया...
दिवसेंदिवस मनगावची लोकसंख्या वाढतेच आहे.सध्या आता ४७७ माता भगिनी आणि आमची ४० मुलांचे गोकुळ नांदते आहे.
डॉ. राजेंद्र धामणे